कॉम्रेड पानसरेंवरील हल्ला ही दाभोळकरांनंतरची दुसरी घटना नसून ती पूर्वनियोजित नथुरामी षडयंत्रातील सिध्दीस नेलेली दुसरी घटना आहे. अजून काही जणांची यादी तयार असणार !!!
पण जे कोणी आहेत, भेकड आहेत मारेकरी. गांधीजींचा मारेकरीसुध्दा भेकड होता. निशस्त्र अहिंसावादी तत्वनिष्ठ जीवन जगणाऱ्या व्यक्तिंच्या विचारांचा मुकाबला करता येत नाही, म्हणून बंदूक हाती घ्यावी लागलेले लाचार होता तो !!! आता त्याची जागा चालवताहेत, वडिलधाऱ्या वयोवृध्दांवर भ्याड हल्ला करणाऱ्या संस्कृतीचे वारसदार !!!
दाभोळकर, पानसरेंसारखी माणसे समाजात उजळ माथ्याने निधड्या छातीने फिरतात आणि मारेकरी तोंड लपवत...पराभूत मानसिकतेत !!! कारण अशा हल्ल्यांनंतर पुन्हा हजारों लोक रस्त्यावर उतरतात, आम्ही सारे पानसरे, आम्ही दाभोळकर म्हणत...आम्ही आंदोलनाकरिता रस्त्यावर आहोत आणि ते लपून बसलेत...भेकड साले !!!!
अशी पोस्ट मी फेसबुकवर केली. त्यातल्या नथुरामी शब्दवापराला अनेकांनी आक्षेप घेतला आणि हल्ल्याच्या निषेधासोबत माझाही निषेध केला. हल्ल्यांचा निषेध आणि नथ्थूरामाचे समर्थन ही खरं तर लबाडी आहे....ही मंडळी हल्ल्याचा निषेध तरी का करतायंत ? बरं तो निषेधही माझ्या पोस्टवर येवून केलेला तोंडदेखला आहे. या मंडळींपैकी कोणीही स्वत:च्या वॉलवर निषेधाची उत्स्फुर्त प्रतिक्रिया दिलेली नाही.
मुळात, पोस्टमध्ये आरोपी ठरवलेले कुठे आढळले कोणाला, तेच समजत नाहीये...कारणे काहीही असोत, निशस्त्र वयोवृध्दावर गोळ्या झाडण्याची कन्सेप्ट नथुरामी आहेच की...मग आरोपी कोणीही असूदेत आणि हल्ल्याचा उद्देश्य काहीही असूदेत.....हे वादी, ते वादी किंवा अगदी पाकीट लुटणारे भुरटे चोर का असेनात !!! आपल्याला त्याच्याशी काय देणेघेणे आहे ? मी कोणाहीकडे अंगुलीनिर्देश केलेला नाही. तरी, खाई त्याला खवखवे, अशा प्रतिक्रिया का येताहेत ?
राहिला प्रश्न लोकसत्तातील अग्रलेखाचा....लोकसत्ताच्या अग्रलेखात पुरोगामी कार्यकर्त्यांवर टीका केल्याबद्दल काही लोक नाराज आहेत.
वास्तविक कोणत्या वर्तमानपत्राने कसा अग्रलेख लिहावा, हे आपण ठरवू शकत नाही. त्यातली मते आपल्याला पटली नसतील, तर त्याच वर्तमानपत्राला लेख पाठवून किंवा इतर उपलब्ध समाजमाध्यमांतून त्याचा प्रतिवाद करण्याचा मार्ग आपल्याला उपलब्ध आहे.
अर्थात, हाच न्याय लोकसत्ताला लागू होतो. समाजातील कोणत्या घटनांवर कोणी आणि कशा प्रतिक्रिया द्यायच्या, हे लोकसत्ता ठरवणार काय ?
डाव्याउजवं सोडून एकत्र यायला पाहिजे, असं म्हणताना, ते समाजात डावंउजवं आहे मान्य करतात. पण दाभोळकर-पानसरे अशा हल्ल्यांवेळी "उजवं" कोणी घराबाहेरच पडत नाही, तर एकत्र कधी व कसं येणार ? हा प्रश्न लोकसत्ताकारांना पडत नाही.
सतिश शेट्टीप्रकरणात डावे लोक कुठे असतात, असा प्रश्न संपादकमहाशयांना पडतो, कारण आंदोलनांवेळी ते स्वत:च भाषणे, घोषणा ऐकायला प्रत्यक्ष तिथे रस्त्यावर उपस्थित नसतात आणि त्याचमुळे दाभोळकर-पानसरे हल्ला किंवा सोनई-खर्डा-जवखेडा हत्याकांडांवेळी उजवे कुठे असतात, असा सवाल करण्याचा तटस्थपणा लोकसत्ताकार दाखवत नाहीत.
इतर संपादकांच्या भुमिकांवर आक्षेप घेणारे लोकसत्ता संपादक स्वत: एकातरी वैचारिक लढाईत कधी रस्त्यावर उतरले आहेत काय ?