जात पडताळणी हा मागासवर्गीयांसाठी मोठा त्रासाचा विषय आहे. मुळात जात प्रमाणपत्र काढतानाच काळजी घेतली तर पुढे त्रास होत नाही. जात प्रमाणपत्र काढताना ते अपुऱ्या कागदपत्रांच्या आधारे ओळखीपाळखीने काढले असेल तर पुढे परवड ठरलेली.
आजोबा, वडील, काका, सख्खे भाऊबहिण, चुलत भाऊबहिण, आत्या हि आपली रक्ताची नाती. पूर्वीचा १४ नंबरचा जात उतारा, शाळा सोडल्याचा दाखला, नोकरीतील नोंद, जात दाखला, बोनाफायीड आणि ज्यावर जातीचा उल्लेख आहे असा दस्तावेज यापैकी काही न काही कागदपत्रे आपल्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तींकडे असतात. ती सगळ्यांकडे जावून जास्तीत जास्त गोळा करायची.
त्यासोबत महाराष्ट्रातील जास्तीत जास्त जुन्या वास्तव्याचा पुरावा जोडायचा. अनु. जाती-जमातीसाठी तो ऑगस्ट, १९५० पूर्वीचा लागतो. ओबीसींसाठी १९६७ पूर्वीचा हवा. वडील जर १९५० पूर्वी नोकरीला लागले असतील, तर त्याच्या सेवापुस्तीकेतील तशी नोंद हा सुद्धा निवासाचा पुरावा आहे. किंवा घरातील असे कोणतेही कागद्पत्र ज्यावर या सालापुर्वीचा उल्लेख आहे.
अश्या तयारीने काढलेले जात प्रमाणपत्र भविष्यात अडचणीचे ठरत नाही. जात पडताळणी कितीही काळ लांबवली जाते, ते अर्जदाराची कमजोरी बघून. अर्ज केल्याच्या तारखेपासून ४५ दिवसांच्या आत पडताळणी निर्णय देणे आवश्यक आहे. प्रमाणपत्र पक्के असेल तर पडताळणी हक्काने मुदतीत मागता येते.